शिवसेनेचे भविष्यातील दुखणे कोल्हापुर पोटनिवडणुकीमुळे आताच कळाले!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने त्या जागेवर हक्क सांगितला असताना जर काँग्रेस लढणारच असेल तर महाविकास आघाडीतील शिवसेना मैत्रीपूर्ण लढत देईल, अशी भूमिका घेत शिवसेनेने महाविकास आघाडीला सुसंगत अशी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेेचे तेथील स्थानिक नेते राजेश क्षीरसागर हे या जागेसाठी आग्रही होते. तरी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम मानत काॅंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे मान्य केले आहे. पण यामुळे भविष्यात शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महाविकास आघाडीतून लढण्यासाठी कमी जागा मिळण्याचा धोका आहे.

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत तेथे ज्या पक्षाचे आमदार होते त्याच पक्षाच्या वतीने उमेदवार उभे केले गेले. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार, देगलूर (जि. नांदेड) येथील पोटनिवणुकीची जागा काँग्रेसला मिळाली. आता कोल्हापूर येथील जागा काँग्रेसच्या निवडणूक लढवली जात आहे. हे गणित आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राहणार आहे. हेच सूत्र भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या 2019 च्या निवडणुकीत वापरले गेले होते. त्यात भाजप १६४ व शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढली . मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा भाजपने स्वत:च्या कोट्यातून दिल्या. अशी निवडणूकपूर्व भाजप- सेना युती होऊन भाजपला 105 व शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला. 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागा लढूनही त्यांना 122 (भाजप) आणि 63 (सेना) इतक्या ठिकाणी विजय मिळाला होता.

ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा या सूत्रानूसार आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी होणार आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 54 + पाठिंबा देणारे अपक्ष 20 + शिवसेना 56 आमदार असे एकूण 174 जागांचे समीकरण आहे. यापेैकी शिवसेनेच्या 56 आमदारांचे मतदारसंघ वगळता 118 जागांवर शिवसेनेला विधानसभेची निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय जिथे भाजप उमेदवार निवडून आले आहेत अशा १०५ ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांचेच दुसऱ्या क्रमांकाचे मत घेतलेले उमेदवार होते. त्या ठिकाणी जर दुसऱ्या क्रमांकाला जे उमेदवार होते त्या पक्षाला तिकीट हे सूत्र राहिले तर शिवसेनेला पक्ष वाढविण्यासाठी तडजोडीच्या राजकारणात मर्यादा येणार असे दिसते.

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष युती करणार असल्याची चर्चा आहे. तेथे कोणते सूत्र राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वर दिलेल्या सूत्रानुसार हे गणित राहिले तर तेथेहि शिवसेनेच्या विस्ताराला मर्यादा येण्याचा धोका आहे. पक्ष विस्तारासाठी निवडणुकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावे लागते. त्यासाठी सेनेला मतदारसंघच कमी मिळाले तर विजयाच्या जागाही कमी होण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात हे गणित आले असावे. त्यामुळेच त्यांनी आता पक्षाच्या सर्व खासदारांना पक्षाचे काम करण्यासाठी जबाबदारी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here