उसाचे बिल कर्ज काढून नाही,तर माल विकून द्या : मा.शरद पवारांचा कारखान्यांना सल्ला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एकरकमी एफआरपी द्यायला हरकत नाही. फक्त कर्ज काढून द्यायला लागेल. कर्ज कुणी काढायचे साखर कारखान्यांनी. हे कारखाने कुणाचे तर शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे याबाबत कुठेतरी व्यवहार्य दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. मला वाटते की शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिलेच पाहिजे. मात्र, शक्यतो कर्ज काढून देवू नका ते माल विकून द्या, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांनी काल (ता.२२) सोमेश्वर येथील साखर कारखान्याला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, इंधनाचे दर वाढलेत ही गोष्ट खरी आहे. ती आणखी वाढेल अशी शक्यता आहे. देशाने जेव्हा याबाबत काही पावले उचलणे आवश्यक होते तेव्हा त्यांनी काही केले नाही. कारण चार-पाच राज्यात निवडणुका होत्या. युक्रेन-रशियातील युद्धाचा परिणामही भारतासारख्या देशांवर होवू लागला आहे, असेही पवार यांनी सांगितले.

साखर उद्योगावर बॅंकांचे व्यवहार अवलंबून आहेत. साखर ठेवून तिच्यावर कर्ज काढण्याची पद्धत कमी होवू लागली आहे. साखर तयार करण्याऐवजी इथेनॉल बनवण्याकडे कल वाढला आहे. इथेनॉलचे पैसे महिन्या ते दिड महिन्यात मिळतात. तर साखरेचे पैसे वर्षभरात मिळतात. त्यामुळे वर्षभर व्याजाचा बोजा कारखान्यावर पडतो. यामुळे कारखान्यांची प्रवृत्ती दुसऱ्या रस्त्याने जाण्याकडे वळली. त्याचा थेट परिणाम जिल्हा बॅंकावर व्हायला लागला.

देशात काही राज्ये अशी आहेत जिथे ऊसाचे पिक होते. अशा राज्यांमध्ये धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने यायला लागलेत. ही गोष्ट वाईट नाही. जेवढे इथेनॉल उत्पादीत होईल तेवढी देशाची इंधनाची आयात कमी होवून परकीय चलन वाचेल. हे होताना साखर उद्योगामध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर दुष्परिणाम होणार नाही. याची काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी इथेनॉलसंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरले पाहिजे, असे पवार म्हणाले.

धान्यापासून आणि उसापासून इथेनॉल निर्मिती होत असताना साखर उद्योग टिकेल याची काळजी घेतली पाहिजे. या देशात एकेकाळी कापड उद्योगावर मोठा रोजगार अवलंबून होता. आता कापड उद्योग बंद झाला. आता सर्वाधिक रोजगार उपलब्धी ही खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांवर आहे. त्यामुळे ही कारखानदारी जतन झाली पाहिजे. परदेशात निर्यात करुन परकीय चलन वाढवण्याचे साधन टिकले पाहिजे. साखरेची किंमत हा जसा महत्वाचा भाग आहे. तसा इथेनॉलची खरेदी आणि त्याची किंमत ही गोष्टही महत्वाची आहे. पंतप्रधान याबद्दल सतत बोलतात. जे बोलतात त्याला पोषक धोरण अवलबले तर शेतकऱ्यांना लाभ होईल, असे पवार म्हणाले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here