कोल्हापूरचे शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राजकीय चर्चेला उधाण, आमदार आबिटकर नॉट रिचेबलच्या यादीत गुरुबाळ माळी, कोल्हापूर
महाराष्ट्राच्या राजकीय भुकंपात सहभागी होत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकरांचे नाव नॉटरिचेबलच्या यादीत आले आहे. याचवेळी जिल्ह्यातील पक्षाचे पाच माजी आमदारांनी एकाचवेळी एकत्रित गोवा गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पाचही माजी आमदार एकनाथ शिंदे समर्थक असल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील व हे सर्वजण गोव्यात एकाचठिकाणी आहेत. महाराष्ट्रात राजकीय भुकंप झाला आहे. सेनेचे ३५ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले आहेत. यामध्ये कोल्हापूरचे आमदार आबिटकर, सांगलीचे अनिल बाबर, सातारा जिल्ह्यातील शंभूराजे देसाई, महेश शिंदे यांचा समावेश आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांनी शिवसेनेला आव्हान दिल्याने या भागात खळबळ उडाली आहे.

एकीकडे आमदारांनी सुरत गाठले असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी गोवा गाठले आहे. हे सारे आमदार शिवसेनेच्यावतीने २०१९ ला विधानसभा लढविली होती. पण ते पराभूत झाले होते. यामध्ये क्षीरसागर, नरके, मिणचेकर आणि पाटील यांचा समावेश आहे. हे यातील बहुतांशी माजी आमदार पक्षावर नाराज होते. क्षीरसागर यांचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद कायम राहिले. मात्र इतर चार माजी आमदारांना अडीच वर्षात राज्यात सत्ता असूनही काहींच न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर ते सारे अचानक गोव्याला गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
हे पाचही माजी आमदार हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. शिंदे यांनी या सर्वांना निधीही दिला. सरकार पडले आणि निवडणूक लागलीच तर हे सारे शिंदे यांच्या सोबत राहण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना पाच माजी आमदार एकाचवेळी गोव्यात कसे असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण एकत्रित आहेत. यामुळे यांना कालच या राजकीय भूकंपाची कल्पना असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे पाच माजी आमदार आता शिवसेनेबरोबर राहणार की शिवसेनेसोबत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या तरी या पाच माजी आमदारांच्या गोवा दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

चौकट
आम्ही पाच माजी आमदार गोव्या आहोत हे खरे आहे. आम्ही सारे एकत्रच आहोत. पण आमच्या गोवा दौऱ्याचा आणि राजकीय हालचालींचा काहींही संबंध नाही.
सुजित मिणचेकर, माजी आमदार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here