आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘प्रोजेक्ट कॉम्पिटिशन’ मध्ये स्वेरीचा द्वितीय क्रमांक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर- सोसायटी फॉर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अँड रिसर्च संचलित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजीच्या ‘इंपिटस अँड कॉन्सेप्ट २२’  या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक स्पर्धेत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
            स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उच्चशिक्षणाला, संशोधनाला तसेच  भविष्यात विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरतील अशा उपक्रमांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच हा एक भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश प्रवीण वट्टमवार, कुंज रमनभाई पटेल व इम्रान इकबाल मोगल या तिघांनी ‘इंपिटस अँड कॉन्सेप्ट २२’ या विषयावर आयोजिलेल्या ‘प्रोजेक्ट कॉम्पिटिशन’मध्ये दुसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत देश विदेशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात स्वेरीच्या या तिन विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रभावी ठरवत दुसरा क्रमांक मिळविला. ‘अगूमेंटेड रियालिटी अँड इंटरनेट ऑफ थिंग्स’ या विषयावर त्यांनी आपला प्रकल्प सादर केला होता. आधुनिक जीवनप्रणालीचा एक भाग म्हणजे स्मार्ट ऑटोमेशन तंत्रज्ञान, ज्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढत आहे. या तीनही विद्यार्थ्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि अग्युमेंटेड रिऍलिटी या तंत्रज्ञानाचा  वापर करून आपण नावीन्यपूर्ण  उपकरणे कशी तयार करू शकतो हे प्रोजेक्टच्या माध्यमातुन दाखवून दिले. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण विविध उपकरणे इंटरनेटच्या माध्यमातून नियंत्रित करू शकतो आणि वेळ, पैसा आणि ऊर्जेची बचत करू शकतो, हे ही या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून दाखवून दिले. विविध तांत्रिक विषयांवर इतर विद्यार्थ्यांनी देखील आपले संशोधन प्रकल्प सादर केले होते. त्यासर्व स्पर्धकांमधून स्वेरीच्या या तिन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी तेथील महाविद्यालयाचे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. या प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ.डी. वाय. पाटील टेक्निकल इन्स्टिट्युट  पुणे, द्वितीय क्रमांक स्वेरी, पंढरपूर तर तृतीय क्रमांक विग्नना भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद या महाविद्यालयाला  मिळाला. यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार व विभागातील इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तिन्ही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.प्रशांत पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी , स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी तिन्ही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here