बोगस शाळांवर तात्काळ कारवाईची गावकऱ्यांची मागणी
माऊली भाऊ हळणवर यांनी पीडित कुटुंबियांची घेतली भेट
नांदोरे येथे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दयानंद कदम यांचा १२ वर्षीय मुलगा राजवीर कदम शाळेतून घरी परतत असताना ज्ञानदीप प्रोग्रेस स्कूलच्या खाजगी बसने बेफिकीरपणे वाहन चालवत चिरडून ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
आज माऊली भाऊ हळणवर यांनी कदम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन पर भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी परिसरातील गंभीर समस्या समोर मांडल्या.
ग्रामस्थांनी सांगितले की नांदोरे परिसरात दोन ते तीन खाजगी शैक्षणिक संस्था असून, या शाळांच्या स्क्रॅप मध्ये निघणाऱ्या सुमारे ५० ते ६० खाजगी बसेस विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. मात्र, या बसकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, प्रशिक्षित ड्रायव्हर नाहीत आणि वाहतुकीचे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे मुलांच्या जिवीतास मोठा धोका निर्माण झाला आहे.
तसेच, या शाळांमध्ये दहावी-बारावी परीक्षेदरम्यान बाहेरील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना बसवून २ ते ३ लाख रुपये घेऊन कॉपी करून पास केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा शिक्षण क्षेत्रातील गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू असल्याची माहितीही समोर आली.
दरम्यान, पीडब्ल्यूडी च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. राजवीरच्या मृत्यूने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की—
“या खाजगी शाळांच्या ५० ते ६० बसेसवर तात्काळ कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
