क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत – आमदार शहाजी बापू पाटील
सांगोला तालुक्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रीडा संकुलात क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे. तालुक्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तालुक्यातून आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला आणि गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी क्रीडा संकुलात आधुनिक सुविधा उपलब्ध करुन येत आहेत. क्रीडा स्पर्धेतून खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, अशी आपली अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षक, शिक्षक यांनी प्रयत्न करावेत. खेळाडूंनी प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने भाग घ्यावा. खेळामुळे शरीराबरोबर मनाचेही आरोग्य सुदृढ राहते. खेळाडूमध्ये बालपणीच खिलाडवृत्ती रुजावी यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका वर्षातच अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असलेले ५२ कोटींचे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. सर्वच खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. खेळ खेळताना विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती आणि शिस्तीचे पालन करावे, असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.