सांगोला नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
स्वच्छ सांगोला सुंदर सांगोल्याच्या निर्मितीसाठी मदत होणार
स स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियानांतर्गत सांगोला शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या अंतर्गत शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांगोला नगरपालिकेला १ कोटी ६० लाख ३३ हजार ७८७ रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला अशी शहराची निर्मिती करण्यासाठी तसेच सांगोला शहर कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून नगरविकास विभागाने सांगोला शहरासाठी १ कोटी ६० लाख ३३ हजार ७८७ रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत सांगोला नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्राप्त प्रस्तावास नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या तांत्रिक समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबतचा शासनादेश काढला आहे
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी करणार आहे. ओला कचरा कंपोस्ट प्लॅन्टसाठी ८१ लाख ७२ हजार २१६ रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा २८ लाख ७५ हजार रुपये आणि राज्य सरकारचा २५ लाख ८७ हजार ५०० रुपये तर नगरपालिकेचा २ लाख ८७ हजार ५०० रुपये इतका हिस्सा आहे. सुका कचरा कंपोस्ट प्लॅन्टसाठी २८ कोटी ३३ हजार ४७१ रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा १४ लाख १६ हजार ७३५ रुपये आणि राज्य सरकारचा १२ लाख ७५ हजार ०६२ रुपये तर नगरपालिकेचा १ लाख ४१ हजार ६७४ रुपये इतका हिस्सा आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० लाख २८ हजार १०० रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. सांगोला नगरपालिकेला १ कोटी ६० लाख ३३ हजार ७८७ रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यात केंद्र सरकारकडून ४९ लाख २८ हजार रुपये तर राज्य सरकारकडून ४४ लाख ३५ हजार २०० रुपये उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी ६१ लाख ७७ हजार ७८७ रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाकरीता केंद्र, राज्य व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा राहणार असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे स्वच्छ सांगोला सुंदर सांगोल्याच्या निर्मितीसाठी मदत होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.