राजाराम शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी रंगला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळा“`
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
राजाराम शिक्षण संकुल, पंढरपूर येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत राजाराम शिक्षण संकुलाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडत असल्याने शिक्षकांचे कौतुक करत शिक्षणाबरोबरच उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास राजाराम शिक्षण संकुलचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव सर, संस्थापक सचिव सौ. रजनीताई जाधव, उपाध्यक्ष राज जाधव, प्राचार्य शरद चव्हाण सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच आकर्षक नृत्याविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात ‘भारत माता की जय’ आणि देशभक्तीच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव यांनीही आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा समारोप राजाराम शिक्षण संकुलचे प्राचार्य शरद चव्हाण यांनी आभार प्रदर्शनाने केला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.
