
मोहोळ रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांचे थांबे पूर्ववत करा व तिकीट काउंटर चालू करा!
खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ वाशीयांचे निवेदन
मोहोळ रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा मिळावा, काही नवीन गाड्यानां ही थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ येथील विविध सामाजिक संस्था व पक्ष संघटनांच्या वतीने देण्यात आले.
मोहोळ रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यपूर्व काळापासून व कोविडचा प्रादुर्भाव सुरू होईपर्यंत चेन्नई मुंबई मेल, सिद्धेश्वर एक्सप्रेस, आदी गाड्यांना थांबा होता. तसेच मिरज व पॅसेंजर या ही गाड्या थांबत होत्या. मात्र कोविड काळात या सर्व गाड्या बंद झाल्या.
कोविड संपल्या नंतर रेल्वे वाहतुकी सुरळीत झाली, मात्र मोहोळचा थांबा पूर्ववत सुरू झालाच नाही. यामुळे मुंबई- पुणे नागपूर आदी ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी जाणाऱ्या मोहोळ शहरातील व्यापारी व अन्य नागरिकांची मोठी अडचण होत आहे. या साठी खासदार महाडिक यांची भेट घेऊन त्यांना याची सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यावर त्यांनी मी आगामी अधिवेशनात दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून यावर मार्ग काढतो, मी याच टाईम टेबल कमिटीवर आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या महिन्या भरापूर्वी रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मोहोळ रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती.
त्याही वेळी या सर्व मंडळींनी मिळून दिलेल्या निवेदनावर चर्चा करून येत्या आठ दिवसात मोहोळ रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र सुविधा लगेच सुरु करतो असे ठाम आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र दीड महिना उलटून गेल्यानंतर ही अद्याप कसलीच हालचाल झाली नाही. त्यामुळे तिकिटा साठी मोहोळ शहरातील व्यापारी व अन्य नागरिकांना सोलापूर किंवा कुर्डूवाडी शिवाय पर्याय नाही.याचीही माहिती खासदार महाडिक यांना देण्यात आली.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, सुनील चव्हाण, सुशील क्षीरसागर, अविनाश पांढरे, महेश सोवनी, सतीश काळे, राजू उराडे, सुनील पवार, उमर शेख, श्रीकांत शिवपुजे, रमेश बारसकर, ज्ञानेश्वर देशमुख, राहुल व्यवहारे सोमेश क्षीरसागर, अतुल क्षीरसागर, आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.