न्यु सातारा महाविद्यालयामध्ये बाप्पाचं उत्साहात आगमन
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असताना, न्यु सातारा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीदेखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयांच्या आवारात गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवाचे नियोजन केले. यासाठी वर्गणीपासून रोजच्या आरती, प्रसादापर्यंत सर्व नियोजन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेले होते .
श्रीफळातून प्रकट झालेला बाप्पा असा देखावा विद्यार्थ्यांकडून यावेळी साकारण्यात आला. यामध्ये सिंहासन, सजावट आणि प्रवेशद्वार असा देखावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला . विद्यार्थ्यांकडूनचं या गणेशोत्सव व्यवस्थापनाची जबाबदारी उचलण्यात आली. सात दिवसांच्या या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्यं म्हणजे, आलिशान सजावट आणि श्रीफळातून बाप्पाचं प्रकटीकरण.
या सात दिवसांमध्ये पहिल्या दिवशीच्या प्राणप्रतिष्ठाचे पूजन प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले तर उर्वरित सहा दिवसांसाठी प्रत्येक विभागाला पूजेचा मान देण्याचं नियोजन यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. अशाप्रकारे बाप्पाच्या आगमनाने महाविद्यालयातील सर्व वातावरण तरोताजा करण्याचं काम विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम निकम साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राध्यापक सुरज जैयस्वाल यांच्याकडून करण्यात आले.