गावठी पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
गावठी पिस्तुलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित उद्धव कडलासकर (वय २४, रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरातील आंबाबाई पटांगण येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या काऊंटरजवळ बसलेले महावीर ऊर्फ लल्या संजय अभंगराव (वय ३३, रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर) यांच्या चेहऱ्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेत अभंगराव गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रोहित कडलासकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) तसेच आर्म ॲक्ट कलम ३, २५ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासून त्याच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन स्वतंत्र पथके तयार केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुन्हा करून पसार झालेला आरोपी सुरुवातीला लातूर येथे आणि त्यानंतर सोलापूर येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपीविरुद्ध नऊ गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेला रोहित कडलासकर हा एमपीडीए कायद्यान्वये कारवाई झालेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेसंबंधी एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. या कारवाईत डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार सुजित उबाळे, अनिल बनसोडे, गणेश पवार, सचिन हेंबाडे, अस्लम काझी, बापू मोरे, सुनील मोरे, शहाजी मंडले, हर्षद ठाकर आणि दीपक नवले यांनी सहभाग घेतला.
