मंदिर समितीचे कर्मचारी ज्ञानेश्वर काळू सोळंकी यांचे दुःखद निधन!
(मागील वीस वर्षापासून जवळजवळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मध्ये सोळंकी यांनी बजावली आपली सेवा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी ज्ञानेश्वर काळू सोळंकी यांचे शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मंदिर समितीच्या कर्मचारी वर्गात शोककळा पसरली आहे.
ज्ञानेश्वर सोळंकी हे मागील २० वर्षांपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास, एमटीडीसी भक्तनिवास तसेच श्री संत तुकाराम भवन अशा विविध ठिकाणी सफाई कर्मचारी म्हणून आपली सेवा बजावली. मंदिर समितीच्या विविध आस्थापनांमध्ये त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने काम केले.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. श्री. सोळंकी यांच्या निधनाने मंदिर समितीने प्रदीर्घ काळ सेवा बजावणारा एक कर्मचारी गमावला आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मंदिर समिती सहभागी आहे.
