विक्रम भैय्या शिरसट यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; नालेसफाई व धोकादायक इमारतींवर तातडीच्या कारवाईची मागणी!
(आगामी अधिक मास व आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची केली महत्त्वपूर्ण मागणी!)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
आगामी पावसाळा आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, गाळ काढणी तसेच धोकादायक इमारतींबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई व गाळ काढणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन शहरात पाणी साचण्याच्या समस्या टाळता येतील. शहरातील विविध भागात पावसाळ्यात गटारी तुंबून पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रकार हा दरवर्षीचाच आहे. यावर योग्य अभ्यास करून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना केल्यास नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, आषाढी यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविकांचे आगमन होत असल्याने आणि यंदाच्या अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या व धोकादायक इमारती तसेच घरांची पाहणी करून दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधितांना सूचना देणे अथवा त्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या सर्व बाबींवर नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे.

