पंढरपूरची जनता त्याच त्याच चेहऱ्याला कंटाळली असून नवीन चेहरा हवा आहे:- अभिजीतआबा पाटील
(लोकसभा निवडणुकीपुरता भाजपला पाठिंबा होता मी सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच)
लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून भाजपबरोबर गेलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. कारखान्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी मी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता महायुतीबरोबर गेलो होतो.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी निश्चितपणे लढवणार आहे, अशी घोषणा पाटील यांनी माढ्यातून केली.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये राजकीय तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजीत पाटील हे कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार, हे मात्र स्पष्ट केलेले नाही.
माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. माझा पक्ष, मतदार संघ अद्याप निश्चित नाही; परंतु मी विधानसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
विठ्ठल कारखान्यासमोर निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी केवळ लोकसभा निवडणुकीपुरता मी महायुतीसोबत गेलो होतो. विधानसभेसाठी माझ्या समोर सर्व पर्याय खुले आहेत, त्यामुळे मी निवडणूक लढवणार, हे स्पष्ट आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १४ संचालक हे माढा विधानसभा मतदारसंघातील असून माझे स्वतःचे देगावही माढा विधानसभा मतदारसंघात येते, असे सांगून त्यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे, असे असले तरी त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माढा आणि पंढरपूर-मंगळवेढा या दोन विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कात आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न काही प्रमाणात तरी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, जनतेला नवीन चेहरा हवा आहे, त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढवणार, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी राज्य सरकारला हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी विनंती केली आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात मी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
चौकट
पंढरपूर-मंगळवेढा व माढा विधानसभा मतदारसंघात चाचणी सुरू असून दोन्हीही मतदारसंघ माझ्यासाठी नवीन नसून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मोहोळ माढा व पंढरपूर-मंगळवेढा चारही मतदारसंघात माझा प्रभाव असून मी लवकरच कोणत्या मतदारसंघातून व कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत जाहीर करणार आहे.
अभिजित धनंजय पाटील
चेअरमन विठ्ठल सह कारखाना