आषाढी वारी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरु

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर:- आषाढीवारीच्या निमित्ताने होणार वाढती गर्दी लक्षात घेता. आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन सुलभ व तत्पर होण्याच्या दृष्टीने आज शुक्रवार दिनांक 01 जुलै 2022 पासून ‘श्री’ चे दर्शन 24 तास सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 10 जुलै 2022 रोजी होणार असून, आषाढी वारी निमित्त पायी पालखी सोहळ्यासोबत परराज्यातील तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत पंढरपूरात सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून, मंदीर प्रशासनाकडून चांगला दिवस मुहर्त पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांसाठी 01 ते 18 जुलै 2022 या कालावधीत 24 तास दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे.

सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि.18 जुलै) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपुजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्री चे पददर्शन 22.15 तास सुरु राहील तर मुखदर्शन 24 तास सुरु राहील असे श्री. गुरव यांनी सांगितले.

श्री चे दर्शन 24 तास सुरु केल्याने आता दररोज 40 ते 45 हजार भाविकांना पददर्शन तर 50 ते 55 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत दररोज एक लाख भाविक दर्शन घेत असतात. या कालावधीत श्री चे 24 तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन होणार असल्याचे श्री गुरव यांनी सांगितले.

यावेळी मंदिर समितीचे सह. अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह भ प प्रकाश जवंजाल, ह भ प शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here