सिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर तलावात ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे भाविकांमध्ये संताप निर्माण झाला असून, 24 तासांत तलावात येणारे सांडपाणी थांबविले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेतील सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिला आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.

सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाटाजवळ उभारण्यात आलेल्या ओपन जीममध्ये गटारीचे पाणी येत असून, हे पाणी तलावात मिसळत असल्याची तक्रार शिवसेनेचे महेश धाराशिवकर आणि उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी सभागृहनेते पाटील यांच्याकडे केली होती. त्याची तत्काळ दखल घेत पाटील यांनी तलावात घाण पाणी येत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. या कामाचा ठेका दिलेल्या मक्तेदारासह अधिकाऱयांची त्यांनी कानउघाडणी केली.

विष्णू घाटासमोर असलेल्या रस्त्यावर मोठा खड्डा आहे. तेथून घाण पाणी तलावात येत आहे. या घाण पाण्यामुळे खेळाचे साहित्यदेखील खराब होत आहे. रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा, अशी सूचना पाटील यांनी अधिकाऱयांना दिली. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली शहरातील सर्व मुख्य रस्ते खोदून ठेवले आहेत. जिथे काम झाले आहे, अशा ठिकाणी पुन्हा खोदाई चालू आहे. हा पैशाचा अपव्यय आहे. मैलामिश्रित पाणी भुयारी गटारातून जायला पाहिजे; परंतु ते मंदिराच्या तलावात मिसळत आहे. हे पाणी न थांबल्यास दोषींवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केली.

सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट हे पवित्र ठिकाण आहे. याठिकाणी मानाच्या आजोबा गणपतीचे विसर्जन केले जाते. अशा ठिकाणी गटाराचे पाणी मिसळत आहे. हा आमचा हिंदू धर्माचा प्रश्न आहे. जर हे पाणी येणे थांबले नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे विजय पुकाळे यांनी दिला आहे.

श्री सिद्धेश्वर तलावात ड्रेनेजचे पाणी येत असल्याची पाहणी केली असून, ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. हे काम येत्या चार दिवसांत पूर्ण केले नाही तर ठेकेदारावर गुन्हा दाखल करू, अशी माहिती संजय धनशेट्टी यांनी दिली.

…तर अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासणार!
श्री सिद्धेश्वर तलाव परिसरात नागरिक दररोज सकाळी फिरायला येतात. ड्रेनेजचे पाणी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या तलावात मिसळते. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱयांचा हा गलथान कारभार आहे. हे घाण पाणी थांबले नाही तर सीईओ आणि अन्य अधिकाऱयांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे.

…तर अधिकाऱयांना सिद्धेश्वरभक्त धडा शिकवतील
गटाराचे घाण पाणी सिद्धेश्वर तलावात सोडण्याचा मोठा अपराध ‘स्मार्ट सिटी’अधिकाऱयांनी केला आहे. कोरोनाचे निर्बंध नसताना हजारो भाविक मंदिरात दररोज दर्शनाला येत असतात. ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळी तलावाच्या परिसरात फिरायला येतात. अशा ठिकाणी घाण पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. सिद्धेश्वर तलावात जाणारे हे घाण पाणी थांबले नाही तर सिद्धेश्वरभक्त एकत्र येऊन अधिकाऱयांना धडा शिकवतील, असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here