संस्कृती जपण्याचे काम आवताडे बंधूंनी केले
(पालकमंत्री जयकुमार गोरे; कामती येथे ‘सिनाई’च्या हुरड्याचा घेतला आस्वाद)
आज जुन्या गोष्टी मागे पडत आहेत. मागे ज्वारी भरात आल्यानंतर मोठमोठ्या हुरडा पार्टी व्हायच्या, परंतु आताच्या युगात हुरडा लोप पावत असून बऱ्याच नवतरुणांना हुरडा खायला सुद्धा मिळत नाही. विशेषता शहरी भागातील लोकांना सध्या कुठे मिळत नाही, ही संस्कृती बुडत आहे परंतु कामती येथील आमचे सहकारी अंकुश आवताडे व त्यांचे बंधू लहू अवताडे यांनी खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचे काम या हुरडा पार्टीच्या माध्यमातून करत असल्याची प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.
कामती खुर्द येथील सिनाई ऍग्रो टुरिझम येथे आयोजित पारंपरिक हुरडा महोत्सवात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून हुरड्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवनशैली आणि पारंपरिक खाद्यपदार्थ यांचे जतन करणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, मोहोळचे माजी नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर, सिनाई ऍग्रो टुरिझमचे एम.डी. लहू आवताडे यांच्यासह ज्ञानेश्वर पाटील, संदीप आवताडे, विठ्ठल माळी, द्रोणा लेंगरे, मसुदेव आवताडे, दादासाहेब मिसाळ, शाम आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सिनाई ऍग्रो टुरिझम हा केवळ पर्यटन प्रकल्प नसून ग्रामीण भागातील पारंपरिक शेती, देशी खाद्यसंस्कृती, हुरडा, भाकरी, चुलीवरील पदार्थ तसेच गावाकडची जीवनपद्धती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा आदर्श उपक्रम आहे. शहरीकरणामुळे लुप्त होत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सिनाई ऍग्रो टुरिझमच्या माध्यमातून होत आहे. तसेच या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिनाई ऍग्रो टुरिझमच्या दोन्ही बंधूंचे पालकमंत्र्यांनी मनापासून कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन अंकुश भैय्या आवताडे यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे मान्यवरांना ग्रामीण संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
