न्यु सातारा कॉलेजमध्ये जनरल सायन्स अँड ह्युम्यानिटी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न
(पालक प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आपली मनोगते)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
न्यु सातारा कॉलेजमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पालक, विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा.महादेव घोंगडे, संस्था सचिव मा. गोरक्षनाथ पाटील,प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य विशाल बाड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी स्वागत जनरल सायन्स अँड ह्युम्यानिटी विभागाचे प्रमुख मा. बाळासाहेब ननवरे यांच्याकडून करण्यात आले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सपना धोडमीसे यांनी केले. विभागाचे प्रमुख बाळासाहेब ननवरे सर यांच्याकडून महाविद्यालयाचा मागील तीन वर्षाचा प्रगतीचा अहवाल पालकांसमोर सादर करण्यात आला.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच चारित्र्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांचा समन्वय आवश्यक आहे. अशा मेळाव्यांतून संवाद अधिक दृढ होतो.”
या वेळी प्रमुख पाहुणे मा .महादेव घोंगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत सांगितले की, “शिक्षण फक्त पुस्तकात नाही तर आचरणात दिसले पाहिजे. पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचा मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थी यशस्वी होतात.”
संस्थेचे सचिव गोरख बापू पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत, कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांचे कौतुक केले आणि पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात पालक प्रतिनिधी म्हणून गणेश आटकळे, शितल सूर्यवंशी व भावीन गांधी हे उपस्थित होते.पालक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच काही रचनात्मक सूचनाही दिल्या. विद्यार्थ्यांनीही या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त करत शिक्षणासोबतच संस्थेकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता दर्शवली.
या प्रसंगी शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल व्यासपीठ प्रमुखांनी व उपस्थितांनी विभागातील सर्व शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक शिवकुमार साखरे यांनी केले.
एकूणच, न्यु सातारा कॉलेजचा पालक मेळावा हा विद्यार्थी-पालक-शिक्षक संवादाचा एक उत्साहवर्धक सोहळा ठरला.

