
सात लोक घेऊन आले होते विठ्ठलाचा बोगस टोकन दर्शनपास
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन आलेल्या सात भाविकांना मंदिर समितीने पकडले आहे. मंगळवारी सात भाविकांनी बनावट टोकन दर्शन पास दाखवून दर्शन प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेतली आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावित वेळेत दर्शनहॉलमध्ये प्रवेश घेता येणार आहे, ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल या अनुषंगाने टोकण दर्शन पद्धत सुरू करण्यात आली आहे.
परंतु मंगळवारी सकाळी सात भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी बोगस ऑन लाईन पास घेऊन आले होते. ही बाब दर्शनसाठी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यानंतर संबंधित लोकांना मंदिर समितीच्या वाहनांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे आणून चौकशीचे काम सुरू आहे.