
पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर!
(तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या प्रशासनास सूचना!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत त्यांना आधार दिला. अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.
सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास वासुद, अकोला, कडलास, राजुरी, निजामपूर, चोपडी, नाझरा या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला. ढगफुटीसदृश्य पावसाचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे फळबागाचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला.
सततच्या पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे. मका, डाळिंब, केळी, बाजरी, मूग, उदीड, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे व नवीन कर्ज काढून पिके लावतात, मात्र ती पिके पाण्याखाली गेल्याने महिन्यांचे कष्ट पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार संतोष कणसे, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, तलाठी मझिना इनामदार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेती पिकात सर्वत्र पाणी साचलेले आहे, त्यामुळं पीक नुकसान खूप जास्त झाले आहे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना भेटून आधार देणे आवश्यक असल्यानेच शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आधार देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत व्हायला पाहिजे असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले.
यावेळी विजय बाबर, दत्ता जाधव, उत्तम गायकवाड, संग्राम गायकवाड, प्रशांत तेली, सुनील महांकाळ, महेश लेंडवे, सुनिल गायकवाड, नंदकुमार शिंदे, सोमनाथ शिंदे, हेमंत शिंदे, किसन शिंदे, पिंटू शिंदे, स्थानिक पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
*चौकट*
*अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे*.
