पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकमुक्तीचा संदेश!
नवी बाजारपेठ – पांडुरंग तात्या माने फाउंडेशन च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नवी पेठ परिसरातील चहा हॉटेल चालकांना काचेचे चहाचे ग्लास भेट देऊन प्लास्टिक कप वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असतानाही अनेक ठिकाणी प्लास्टिक कप व कॅरीबॅगचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येते. विशेषतः गरम चहा प्लास्टिक कपमध्ये ओतल्याने त्यातून सूक्ष्म प्लास्टिक कण (मायक्रो फायबर्स) निर्माण होतात व ते शरीरात जाऊ शकतात. एखादी व्यक्ती दिवसातून तीन ते चार वेळा प्लास्टिक कपमधून चहा घेत असेल, तर दीर्घकालीन आरोग्य धोक्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर आजार उद्भवू शकतात, असा जनजागृतीपर संदेश यावेळी देण्यात आला.
फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, प्लास्टिक बंदी असतानाही उत्पादक व विक्रेते खुलेआम विक्री करत आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधत समाजहिताच्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन व आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल, असे फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपस्थित फाउंडेशन उपाध्यक्ष बालाजी कोळी, प्रसाद कोळी, राजाभाऊ परदेशी, दिपक शिंदे, अक्षय बामणे व इतर उपस्थित होते.
