पंढरपूर रेल्वे स्थानकाचा विकास जलद गतीने व्हावा:प्रणव परिचारक
दक्षिणकाशी असणाऱ्या पंढरपूर रेल्वे स्थानकाचा अमृत योजनेतून होत असणारा विकास हा जलद गतीने पूर्ण व्हावा. पंढरपूर पासून देहूरोड स्टेशन पर्यंत इंटरसिटी तर पंढरपूर दादर रेल्वे गाडी दररोज सुरू करावी. दक्षिणकाशी असणाऱ्या पंढरपूरचा रेल्वेचे अनुषंगाने विकास करावा. अशा आग्रही मागण्या क्षेत्रीय रेल्वे परामर्शदात्री समितीच्या बैठकीत केल्या असल्याची माहिती प्रणव परिचारक यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे परामर्शदात्री समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस समितीचे संचालक या नात्याने प्रणव परिचारक उपस्थित होते. यावेळी मध्य रेल महाप्रबंधक, श्री रामकरण यादवजी, उपमाहाप्रबंधक अभय मिश्राजी व इतर मध्य रेल चे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वे तीर्थक्षेत्रांना जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला. या अनुषंगाने दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूरच्या रेल्वे स्थानकाच्या विकासासोबत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत या बैठकीत प्रणव परिचारक यांनी प्रमुख मुद्दे मांडत चर्चा केली.
या बैठकीत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या अमृत योजनेतून होत असणाऱ्या विकासाचे आणि नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम जलद गतीने पूर्ण करून भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावे. पंढरपूर रेल्वे स्थानकावर लिफ्ट, पुस्तकालय, औषधालय यासह नवीन दोन प्लॅटफॉर्म निर्माण करून पाच प्लॅटफॉर्मचे पंढरपूर रेल्वे स्थानक तयार करावे. तसेच संपूर्ण रेल्वे स्थानकासह रेल्वे हद्दीच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करावी. अशी मागणी परिचारक यांच्या मार्फत करण्यात आली.
पंढरपूर दादर ह्या एक्सप्रेसला पंढरपुरातून चांगला प्रतिसाद आहे. हीच एक्सप्रेस रेल्वे गाडी दररोज पंढरपुरातून दादर साठी सुरू करावी. तसेच पंढरपूर ते देहूरोड स्टेशन या मार्गावर दररोज इंटरसिटी गाडी सुरू करावी. जेणेकरून पंढरपूर पासून देहू आळंदीला जोडणारा मार्ग रेल्वेने तयार होईल. तसेच दौंड -इंदोर ही एक्सप्रेस रेल्वे गाडी कुर्डूवाडी पर्यंत वाढवावी. जेणेकरून सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना व्यापाऱ्यांना इंदोरकडे जाणारा मार्ग सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. पंढरपूर कोल्हापूर , पंढरपूर नागपूर, अशा रेल्वेगाड्यांबाबतही चर्चा झाली. तसेच पंढरपूर ते कुर्डूवाडी या मार्गावर देखील लोकल गाडीच्या तत्त्वावर दिवसभरात गाड्या सुरू कराव्यात. जेणेकरून पंढरपुरी तीर्थक्षेत्र येणारा भाविक कुर्डूवाडी जंक्शनच्या माध्यमातून पंढरपुरापर्यंत सहज येऊ शकेल.
क्षेत्रीय रेल्वे परामर्शदात्री समितीच्या बैठकीत प्रणव परिचारक यांनी रेल्वे प्रश्ना बाबत केलेल्या मागण्या बाबत रेल्वे प्रशासनाचे सकारात्मकता दर्शवली आहे. यामध्ये पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या कामाबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आले. तसेच रेल्वे गाड्या संदर्भातील मागण्यांबाबत देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन रेल्वे प्रशासन यांच्याकडून प्रणव परिचारक यांना देण्यात आले आहे.