
पंढरपूर कॉरिडॉरला 458 व्यापाऱ्यांचे अभिरूप मतदानातून तीव्र विरोध!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘पंढरपूर कॉरिडॉर’ सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. शासनाच्या जोरदार प्रयत्नांनंतरही मंदिर परिसरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
शनिवारी दि. 14 जून रोजी पंढरपूर कॉरिडॉर विरोधी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने मंदिर परिसरात अभिरूप मतदान घेण्यात आले. या मतदानात तब्बल 458 व्यापाऱ्यांनी कॉरिडॉरच्या विरोधात मत दिले, तर केवळ 15 व्यापाऱ्यांनी प्रकल्पाच्या बाजूने मतदान केले. यावरून स्थानिक जनतेचा विरोध किती तीव्र आहे, हे स्पष्टपणे समोर आले आहे.
दरम्यान, शासनाकडून या प्रकल्पाला पंढरपूरचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास साधण्याचे कारण दिले जात आहे. मात्र, स्थानिक व्यापारी आणि रहिवाश्यांच्या भावना पाहता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्य सरकारने या विरोधाची गांभीर्याने दखल घेऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधावा आणि योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.