कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा सप्ताहाचे आयोजन
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १५ दिवस कर्मयोगी सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पांडुरंग परिवाराच्यावतीने 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कार्य काळामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक स्मृती सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामधे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधे “मोफत नेत्रतपासणी व लेन्स बसवून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर” राबवण्यात येणार आहे. याबाबत आमदार प्रशांतराव परिचारक, उमेश मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रणव परिचारक आणि पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेत्यांच्या अध्यक्षतेखाली शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार स्वर्गीय सुधाकर पंतांचा वसा आणि वारसा सेवेच्या रूपाने सुरू ठेवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवा सप्ताह मधील विविध कार्यक्रमाचे आयोजन हे पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक, पांडुरंग परिवारातील पदाधिकारी पांडुरंग परिवारातील युवा नेते मित्रमंडळी, आणि कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींकडून करण्यात आले आहे.
१७ ऑगस्ट शनिवारी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदिनी पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास पंढरपूर शहरातील नागरिकांनी पांडुरंग परिवारातील सदस्य हितचिंतक, मित्र, आप्तेष्ट यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मोठ्या मालकांचा विचारांचा वारसा सेवारुपी आत्मसात करावा. असे आवाहन या निमित्ताने युवा नेते प्रणव परिचारक यांनी केले आहे.