मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. साठी अधिसूचना जाहीर.
औद्योगिक विकासाला मिळणार चालना-आ.बबनराव शिंदे
344 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित.
माढा मतदारसंघातील मोडनिंब,ता.माढा येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेचा मार्ग मोकळा झाला असून मोडनिंब व परिसरातील 344 एकर क्षेत्रावर नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी उद्योग विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले, माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोडनिंब ही मोठी बाजारपेठ म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच मोडनिंब हे शहर राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच मोडनिंब हे गाव ब्रॉडगेज रेल्वे लाईन शेजारी येत असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने या ठिकाणी नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी स्थानिक नागरिक,व्यापारी,लहान-मोठे उद्योगी यांचेकडून मागणी होत होती. या संदर्भात सन 2018 पासून पाठपुरावा सुरु होता. तसेच तत्कालीन उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी फेब्रुवारी,2020 रोजी मंबुई येथे सुचना दिलेल्या होत्या. त्यानंतर मौजे मोडनिंब येथील 280.67 हे.आर. व मौजे सोलकरंवाडी येथील 63.47 हे.आर. असे एकूण 344 एकर या जागेची क्षेत्रीय अधिकारी यांचेकडून पाहणी करून भू निवड समितीकडून अहवाल शासनास सादर करणेत आला होता. तसेच शासनाच्या उच्च अधिकार समितीने या प्रस्तावीत क्षेत्रास मान्यता दिलेली असून या क्षेत्राचा कंटूर सर्व्हे देखील झाला आहे. दि.2 जुलै,2024 रोजी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे दालनात संबंधित अधिकारी यांचे समवेत मिटींग बोलावून मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी महामंडळाचे प्रकरण 6 लागू करून भूसंपादनाची कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.
उद्योग मंत्रालयाकडून राज्यपालांच्या आदेशानुसार 344 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले. उद्योग विभागाचे सह सचिव संजय देगावकर यांच्याकडून हा अध्यादेश प्राप्त झाला आहे. यावेळी आ.बबनराव शिंदे यांचेसह करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेचा मार्ग मोकळा झालेला आहे. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
लवकरच भूमिपूजन होणार
टेंभुर्णी,कुर्डूवाडी येथे यापूर्वीच एम.आय.डी.सी. स्थापन करुन तरुणांना उद्योजकांना नवीन संधी निर्माण करुन दिलेली आहे. टेंभुर्णी येथील जागा संपलेली आहे. आता मोडनिंब येथे नवीन 345 एकराची एम.आय.डी.सी. मंजूर झाल्यामुळे येथील स्थानिक तरुणांना रोजगारांची संधी मिळणार असून ग्रामीण भागातील अनेक उद्योजक निर्माण होऊन विकासासाठी मदत होणार असल्याने मागील चार-पाच वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्याने आज मंजूरीचे पत्र मिळाले याचे मला समाधान आहे. याची जागा निश्चित झाली असून आता लवकरच भूमिपूजन करणार आहे.- आ.बबनराव शिंदे