विशाळगड दुर्घटनेमधील शिवभक्तांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत:-खासदार धनंजय महाडिक
(अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये शिवभक्तांवर झाले होते गुन्हे दाखल)
१४ जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याबद्दल आता दावे – प्रतिदावे होत आहेत. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर आता पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन, राज्य शासनाने संबंधित शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू शिवभक्त कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.