
माझी उणीदुणी काढली तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही!
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला इशारा!
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सहा गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिला, माझी उणीदुणी काढली, तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही असा इशारा दिला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, माळेगाव कारखान्याबाबत विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. याउलट विरोधकांच्या सत्ता काळात कोण काय करायचे? आताही कोणाकडे कारखान्याचे ड्रायव्हर आहेत हे बघा. पाच वर्ष तुम्ही बोर्डाच्या मिटींगला येत नाही आणि कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता. हे कोणत्या नियमात बसते? असा सवालही केला.
पुढे बोलताना पवार यांनी कशाला उगीच कोणाची उणीदुणी काढायची? पण तुम्ही माझी उणीदुणी काढली, तर मी तुम्हाला तसं सोडणार नाही. आम्ही निलकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जाणार आहे. ब वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे असेन असा विश्वास व्यक्त करत पवार म्हणाले, माळेगावचे खासगीकरण केले जाईल, हा आरोप चुकीचा आहे. वास्तविक विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खासगी कारखाने काढण्याचा निर्णय झाला.राज्यात अनेक नेते, मंत्री कारखान्याचे प्रतिनिधित्व करतात, मग मी संचालक असलो तर बिघडले कुठे? असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तसेच मी संचालक मंडळात असेन, तर तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील सर्वच विषय वेगाने मार्गी लागण्यास मदतच होईल. याचाही विचार सभासदांनी करायला हवा. आम्ही शब्द टाकला तर व्यापारी मदत करतील. सीएसआरच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी मिळू शकेल. कारखाना परिसरातील अनेक कामे मार्गी लागतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, बाळासाहेब तावरे व केशवराव जगताप यांच्या काळात कारखान्यावर 229 कोटींचे कर्ज असले, तरी कारखान्याकडे 269 कोटी रुपये किंमतीची साखर शिल्लक आहे, ही बाबही विचारात घ्यायला हवी. या काळात कर्ज न काढता खेळत्या भांडवलातून अनेक खर्च भागविले आहेत. कारखान्यावर कोणताही अतिरिक्त भार न टाकता परिसराचा कायापालट विविध माध्यमातून आम्ही करु शकतो, भावावर कसलाच परिणाम होऊ न देता करू शकतो. माळेगाव कारखान्याला राज्यात सर्वोत्तम कारखाना म्हणून नावलौकीक मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.