स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकसुनावणीला उपस्थित राहावे – दादासाहेब लवटे
रविवारी पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक लोकसुनावणी
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बहुप्रतिक्षित स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील ३०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. १४ गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे ४५ हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात रविवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.
गेल्या २० वर्षापासून बासनात गुंडाळलेली स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना यश आले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून
८८३ कोटी ७७ लाख रुपये खर्चाच्या स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष कामासाठी ७८९ कोटी ५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर अनुषंगिक कामासाठी ९२ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बंदिस्त नलिका करण्यासाठी २५७ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी ३ कोटी ५० लाख ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. १४ गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे ४५ हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी शिवणे, नरळेवाडी, य.मंगेवाडी, बंडगरवाडी, चिकमहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, इटकी, एखतपूर, वाकीशिवणे या १४ गावांतील सुमारे ३९ हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर असे एकूण ४५ हजारांहून अधिक एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे. तरी स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.