खेडभोसे ग्रामस्थांनी केला महसूल अधिकाऱ्यांचा सन्मान!
(कुणबी प्रमाणपत्र वाटपात पंढरपूर तालुका अव्वल)
(“सरकारी काम, सहा महिने थांब” नव्हे नव्हे लगेचच काम…!)
पंढरपूर तालुक्यात कुणबी नोंदी मोठ्या संख्येने सापडल्या आहेत, संबंधितांच्या वारसांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना महसूल प्रशासनाकडून तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले, प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल आणि त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, या भावनेने खेडभोसे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, अव्वल कारकून दादा गावंधरे यांचा सन्मान केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने रेकॉर्ड विभागातील कागदपत्रांची पाहणी केली असता पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या.
खेडभोसे (ता. पंढरपूर) गावातील २४९ कुणबी नोंदी सापडल्या होत्या. या नोंदी शोधण्यासाठी आणि त्यासंबंधितांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तत्परता दाखवण्यात आली, त्यामुळेच खेडभोसे गावातील सुमारे १९५ ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.
प्रशासनाच्या या तत्परतेमुळेच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले याची जाणीव ठेऊन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी आज खेडभोसे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, अव्वल कारकून दादा गावंधरे, सहायक संशोधन अधिकारी तानाजी झोंबाडे यांचा सत्कार केला.
यावेळी पूढारी पत्रकार आंणासो पवार ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, विकास पवार शहाजी जमदाडे, माजी उपसरपंच सिध्देश्वर पवार, सोसायटीचे चेअरमन बंडू पवार, नागनाथ जमदाडे, गणेश जमदाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरूण नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट:
१) “ज्यांच्या पूर्वजांची नावे मोडी किंवा मराठी भाषेत कुणबी म्हणून आलेली आहेत, त्यांच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावे, प्रशासनाच्या वतीने त्यांना तत्परतेने प्रमाणपत्र दिले जाईल, असे अभिवचन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिले.
२) लोकवर्गणीतून काढली कागदपत्रे
गावातील प्रत्येक ग्रामस्थाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी महसुली कागदपत्रे, भूमि अभिलेख विभागातील कागदपत्रे काढावी लागणार होती. त्यासाठी वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात जाणार होता. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून जुने फेरफार, क, ड, ई पत्रक, सर्व्हे उतारा, स्कीमचा उतारा काढला. या कागदपत्रांच्या आधारेच गावातील १९५ कुणबी प्रमाणपत्र मिळू शकले*
.
बंडू पवार, ग्रामस्थ, खेडभोसे