
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशपातळीवरील द्वितीय पुरस्काराने सन्मानित!
(सदर पुरस्काराचे नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मा. नामदार श्री प्रल्हाद जोशी यांच्या शुभहस्ते प्रदान)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा गळीत हंगाम २०२३-२४ मधील कारखान्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय पुरस्कार जाहीर झाला होता. सदर पुरस्काराचे वितरण आज रोजी नवी दिल्ली येथे मा.ना.श्री.प्रल्हाद जोशी, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, (भा.स.),मा.ना.श्रीमती निमुबेन जयंतीभाई बांभनिया, अन्न व सार्वजनिक वितरण, राज्यमंत्री (भा.स.), मा.ना.श्री. सुरेश प्रभु, नागरी विमान वाहतुक मंत्री, (भा.स.) यांचे शुभहस्ते व मा.ना.श्री. अरविंदकुमार शर्मा, सहकारमंत्री (हरियाणा), मा.ना.श्री.शिवानंद पाटील, ऊसमंत्री (कर्नाटक), मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील, सहकारमंत्री (म.रा.) व मा.ना.श्री.लक्ष्मीनारायण चौधरी, ऊसविकास मंत्री, (उ.प्र.) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा स्वीकार कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक(मालक), व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, मा.चेअरमन व संचालक श्री.दिनकरभाऊ मोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, चीफ केमिस्ट श्री.एम.आर. कुलकर्णी, चीफ् अकौंटंट श्री.आर. एम. काकडे आदींनी स्विकारला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक(मालक) यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी गळीत हंगाम २०२३-२०२४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळेच कारखान्यास देशपातळीवरील द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, कामगार, सभासद व हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी केलेल्या कामामुळे हा पुरस्कार कारखान्यास मिळाला असून कारखान्याने पुरस्कार मिळविण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली ही संस्था प्रत्येक वर्षी साखर कारखानदारीमध्ये सर्वोच्च काम करणा-या साखर कारखान्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करित असते. कारखान्याने मागिल काही वर्षापासून अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सौर उर्जा निर्मिती प्लँट, सभासद विमा योजना, शेतकरी प्रशिक्षण, मानव विरहित वजनकाटा, रेन हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, फळ रोपे लागवड, सि.सी.टी.व्ही.चा वापर, मल्टिइंटीग्रेटेड इव्हॉपोरेशन प्लँट, कन्डेशिंग पॉलिशींग युनिट, ऑनलाईन मॉनेटेरींग सिस्टिम, ऊस विकासाच्या विविध योजना, कामगारांसाठीही अनेक सुविधा सुरू केलेल्या आहेत.
कारखान्याच्या रसायन व उत्पादन विभागामध्ये आधुनिकीकरण केले असून गाळप क्षमतेचा पुरेपुर वापर, वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण नगण्य, मिल हाऊस, बॉयलिंग हाऊसच्या कार्यक्षमतेत वाढ, सिझनमध्ये तांत्रिक बाबीमुळे कारखाना बंद राहण्याचे प्रमाण खूपच कमी, साखरेचा दर्जा यामध्ये सर्वोच्च काम केले असून ऊस तोडणी नंतर गाळप होईपर्यंत लागणारा कालावधी अत्यंत कमी करुन ताज्या ऊसाचे गाळप करण्यावर भर दिलेला आहे.
कारखान्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या तत्वानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करुन तेच पाणी परत कारखान्यासाठी वापरले जाते. तसेच बॉयलरसाठी ई.एस.पी, इ.टी.पी. ही अत्याधुनिक यंत्रणा कारखान्याने उभारलेली आहे. साखर कारखान्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर केला जातो. तसेच कारखान्यामधील वाफेचे जादा गरम पाणी कुलिंग टॉवरद्वारे थंड करुन त्याचा पुनर्वापर केला जातो. कारखान्याने सहविज निर्मीती प्रकल्प, मिल हाऊस, बॉयलर हाऊस व बॉयलिंग हाऊसमध्ये ॲटोमेशन केलेले आहे. त्यामुळे कारखान्यास लागणाऱ्या वीजेमध्ये बरीचशी बचत केलेली आहे. कारखान्याने मागील अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणाप्रमाणे ऊस दर दिलेला आहे.
कारखान्याने अल्पावधीमध्ये प्रतिदिन ९००० मे.टन गाळप क्षमता व ३२ मेगावॅट क्षमतेचा सहविज निर्मीती प्रकल्पाची उभारणी करुन प्रतिदिनी ९० के.एल.पी.डी. क्षमतेची डिस्टीलरी उभारलेली आहे. आसवनी प्रकल्पातील सांडपाणी व साखर कारखान्यातील प्रेसमड याद्वारे उत्तम प्रकारच्या कंपोष्ट खताची निर्मीती कारखाना करीत आहे. कारखान्याने अल्पावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार पटकावून कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे.
मा.आ.प्रशांतराव परिचारक
चेअरमन, पांडुरंग शुगर