
जिल्हा नियोजनाच्या बैठकीत विधानसभेची तयारी!
(कृष्णराज महाडिक,वीरेंद्र मंडलिक यांची बैठकीला उपस्थिती)
कोल्हापूरात नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन युवा नेत्यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. युवा नेते कृष्णराज महाडिक हे स्वतंत्रपणे आले आणि सभागृहात बसले तर वीरेंद्र मंडलिक हे शासकीय विश्रामगृहावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत आले आणि जिल्हा नियोजनाच्या बैठकीला उपस्थित राहिले.
त्यामुळे या दोघांची “जिल्हा नियोजनाची वारी अन् विधानसभेची तयारी” अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सुरू झाली.
खासदार धनंजय महाडिक पंधरा मिनिटांनी स्वतंत्र वाहनातून ताराराणी सभागृहासमोर आले आणि तेथून ते सभागृहात जावून बसले. मंडलिक हे आबिटकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या पाठीमागेच उभे होते.
वीरेंद्र मंडलिक हे अधूनमधून रोखठोक बोलत असतात मात्र सध्या ते कागल तालुक्याचे राजकारण हलवू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय कलगीतुराही रंगला होता. त्यामुळे या दोन युवा नेत्यांची नियोजन बैठकीला उपस्थिती मात्र चर्चेची ठरली.