मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. करण्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांचेकडून मंजूरी
औद्योगिक विकासाला मिळाली चालना प्रकरण 6 अंतर्गत भू संपादनाची कार्यवाही सुरू होणार- आ.बबनराव शिंदे
माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब,ता.माढा येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेचा मार्ग मोकळा झाला असून महामंडळाचे प्रकरण 6 लागू करून मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचेकडून मंजूरी मिळाली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले, माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोडनिंब ही मोठी बाजारपेठ म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच मोडनिंब हे शहर राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच मोडनिंब हे गाव ब्रॉडगेज रेल्वे लाईन शेजारी येत असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने या ठिकाणी नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी स्थानिक नागरिक,व्यापारी,लहान-मोठे उद्योगी यांचेकडून मागणी होत होती. या संदर्भात पुढील जरूर ती कार्यवाही करणेबाबत तत्कालीन उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्यानंतर मौजे मोडनिंब येथील 112.27 हे.आर. व मौजे सोलकरंवाडी येथील 25.39 हे.आर. असे एकूण 137.66 हे.आर क्षेत्र या जागेची क्षेत्रीय अधिकारी यांचेकडून पाहणी करून भू निवड समितीकडून अहवाल शासनास सादर करणेत आला होता. तसेच शासनाच्या उच्च अधिकार समितीने या प्रस्तावीत क्षेत्रास मान्यता दिलेली आहे. तसेच या क्षेत्राचा कंटूर सर्व्हे देखील झाला असून या क्षेत्रास प्रकरण महामंडळाचे प्रकरण 6 लागू करणे अद्याप बाकी होते अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
या संदर्भात मंगळवार दि.2 जुलै,2024 रोजी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे दालनात संबंधित अधिकारी यांचे समवेत मिटींग होवून मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी महामंडळाचे प्रकरण 6 लागू करून भूसंपादनाची कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे भू संपादनाची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.या मिटींगसाठी प्रधान सचिव(उद्योग), मुबंई, मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि.म.मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ. वि.म., सह सचिव, उद्योग विभाग, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि.म., महाव्यवस्थापक (भूसंपादन), प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.म. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, जिल्हा दूध संघ संचालक शंभू मोरे,माजी उपसरपंच विशाल मेहता उपस्थित होते. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
मोडनिंब येथे नवीन एम.आय.डी.सी. होणेसाठी शासन स्तरावर सन 2018 पासून पाठपुरावा सुरू होता. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महामंडळाचे प्रकरण 6 लागू करून नवीन एम.आय.डी.सी. मार्ग सुखकर केला आहे. एम.आय.डी.सी. मुळे मोडनिंब च्या विकासाला चालना मिळणार असून या भागातील बेरोजागर तरूण-तरूणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मोडनिंब येथील बाजारपेठ, रेल्वे वाहतूक, व्यापारी, लहान-मोठे उद्योग यांना देखील चालना मिळणार आहे. एक प्रकारे मोडनिंब येथे औद्योगीक क्रांती घडून येणार आहे
– आ.बबनराव शिंदे