
दत्तकला शिक्षण संस्थेत डिजिटल फास्टिंग या विषयावर डॉ. रेखा चौधरी यांचे प्रेरणादायी व्याख्यान
“ग्रामिण स्त्री ते जागतिक नेतृत्त्व” या प्रेरणादायी प्रवासाची साक्ष देणाऱ्या जागतिक उद्योजिका व झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी यांचे “डिजिटल फास्टिंग” या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान दत्तकला शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. चौधरी यांनी सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. “डिजिटल फास्टिंग” म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया आणि स्क्रीन यापासून थोडा वेळ जाणीवपूर्वक दूर राहणे यामुळेच आपले मानसिक स्वास्थ्य, सर्जनशीलता आणि व्यक्तिगत नातेसंबंध अधिक सुदृढ होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या व्याख्यानातून केवळ डिजिटल डिटॉक्सची गरजच नव्हे, तर त्यांनी स्वतःच्या प्रवासात ग्रामीण भागातून जागतिक व्यावसायिक क्षेत्रात कसा प्रवास केला, याचाही प्रेरणादायी आढावा दिला.
डॉ. रेखा चौधरी यांच्या मतानुसार, “या पुढील काळात मानसिक अस्थैर्य व तणावग्रस्ततेची समस्या अधिक गडद होणार आहे. सोशल मिडियाचा अतिवापर हे यामागील एक मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने हळूहळू सोशल मिडियापासून काही वेळ दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. ‘डिजिटल फास्टिंग’ ही केवळ ट्रेंड नाही, तर मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असा सकारात्मक टप्पा आहे. सोशल मिडियाचा वापर गरजेपुरताच आणि विवेकी पद्धतीने करणे ही काळाची गरज बनली आहे.”
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की, “विद्यार्थीदशा ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि पाया घालणारी अवस्था आहे. या टप्प्यावर सोशल मिडियासारख्या व्यत्यय आणणाऱ्या गोष्टींपासून शक्य तितके दूर राहणे, हेच विद्यार्थ्यांसाठी हितकारक ठरेल. अभ्यासावर आणि करिअरच्या दिशेने एकाग्रतेने वाटचाल केल्यासच उज्ज्वल भविष्य घडविता येईल.”
या वेळी दत्तकला शिक्षण संस्था आणि झेप फाउंडेशनच्या यांच्यात शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रातील सहकार्य करण्यासाठी सामंज्यस्य करारावर (MOU) स्वाक्षरी करण्यात आली.
या करारानुसार दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रातील कौशल्ये, संसाधने आणि अनुभव एकत्र आणून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व सशक्तीकरणाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील. तसेच, डिजिटल शिक्षण, कौशल्यविकास, आणि सामाजिक जबाबदारी या क्षेत्रात सहकार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमात दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी या सहकार्यामुळे शिक्षण क्षेत्रात नवे व सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी असा उपयुक्त, प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी व्यक्त केले की, डॉ. रेखा चौधरी यांचे ‘डिजिटल फास्टिंग’ या विषयावरील मार्गदर्शन केवळ तंत्रज्ञानापासून दूर जाण्याचे नव्हे, तर स्वतःच्या आत डोकावून बघण्याचेही एक सुंदर साधन ठरले आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शनाचे कार्यक्रम नियमितपणे व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्थेच्या सर्व विभागाचे विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल दुरंदे यांनी केले तर प्रा. प्रतीक्षा राजगुरु यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. संगीता खाडे यांनी उपस्थित सर्वाना डिजिटल फास्टिंगची शपथ दिली.
