कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आमदार शहाजीबापूंकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत
सांगोल्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रक चालकाने एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
मंगळवार १८ जून रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहूद जवळ (बंडगरवाडी) पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आश्विनी शंकर सोनार, इंदुबाई बाबा इरकर, श्रीमाबाई लक्ष्मण जाधव, कमल यल्लाप्पा बंडगर, सुलोचना रामा भोसले, मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण रा. कटफळ ता.सांगोला यांचा अपघातात मृत्यू झाला. तर मिनाबाई दत्तात्रय बंडगर वय ५० रा. कटफळ ता.सांगोला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.