अजित पवार यांची जनसन्मान नाही, तर जन अपमान रॅली आहे: संजय आण्णा क्षीरसागर
(महायुतीच्या नेत्यांचा पाटील कंपनीने मोठा गैरसमज करून दिला आहे:-संजय आण्णा शिरसागर)
माढा तालुक्याच्या सीमेवर आणि जनतेच्या गैरसोयीचे असताना सुद्धा अनगर गाव मध्यवर्ती ठिकाण दाखवून त्याठिकाणी अपर तहसील कार्यालय मंजुर करून ते लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मोहोळ येथे होणारी जनसन्मान रॅली नसून ती तालुक्यातील जनतेची जनआपमान रॅली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते संजय क्षीरसागर यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी जनसन्मान रॅली निमित्त मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय क्षीरसागर यांनी आपली भमिका मांडताना सांगितले: मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने माजी आमदार राजन पाटील यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना तब्बल चौंसष्ट हजारांचे मताधिक्य दिले. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने राजन पाटील यांची सद्दी संपली असल्याचा संदेश दिला आहे. मात्र असे असताना सुद्धा अजित पवार यांच्या सहित महायुतीच्या नेत्यांना मोहोळ मतदारसंघात अजूनही राजन पाटील यांचाच दबदबा असल्याचा गैरसमज आहे. या गैरसमजातूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाचा फायदा महायुतीला होईल हे गृहीत धरून तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या अनगर या गावात अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला गेला आहे. या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या मंडळातील गावाना हे कार्यालय अतिशय गैरसोयीचे आहे. या गावाला जाण्यासाठी कोणतीही दळणवळण यंत्रणा अस्तित्वात नाही.
हे कार्यालय मंजूर झाल्यापासून तालुक्यातील जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. मोहोळ सारख्या तालुक्याच्या ठिकाणाची बाजारपेठ तब्बल सहा दिवस बंद ठेवण्यात आली होती.मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या महेश देशमुख, शिवरत्न गायकवाड, सत्यवान गायकवाड आणि संतोष सोलंकर यांनी तब्बल आठ दिवस आमरण उपोषण केले होते. प्रचंड जनक्षोबाच्या विरोधात जाऊन हे कार्यालय अनगर येथेच व्हावे यासाठी अट्टाहास करणाऱ्या माजी आमदार राजन पाटील,विद्यमान आमदार यशवंत माने यांना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी पाठबळ दिले असल्याचे आता लपून राहिले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे कार्यालय अनगर येथेच व्हावे यासाठी अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली असल्याची पुडी राजन पाटील यांच्या समर्थकांनी तालुक्यात सोडली आहे.
तालुक्यातील जनतेला फसवून अपमान करणारे अजित पवार जनतेचा कसला जनसन्मान करणार आहेत असा सवाल करीत अजितदादांची ही मोहोळ तालुक्याच्या दृष्टीने जनआपमान रॅली असल्याची टीका संजय क्षीरसागर यांनी केली.
यावेळी सतीश पाटील,महेश धुमाळ,महावीर पुजारी,सोमनाथ व्यवहारे,डॉ. बाळासाहेब वाघमोडे,चांगदेव आतकरे आदी उपस्थित होते.