सीना-माढा योजना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील आक्रमक; जलसंपदा मंत्र्यांकडे ठोस मागणी!
माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठीची गरज लक्षात घेऊन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली.
योजनेची क्षमता ४२५ क्यूसेक असल्याचा उल्लेख असताना प्रत्यक्ष पाणीपुरवठा केवळ २२० क्युसेक मर्यादित राहत असल्याने ही तफावत दूर करून योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. पाईपलाईनची दुरुस्ती, मोटारमधील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करणे आणि उपलब्ध राखीव पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करणे, या मुद्द्यांवर त्यांनी जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले.
केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष पाणी शेतापर्यंत पोहोचले पाहिजे, ही ठाम भूमिका मांडत कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेऊन संबंधित विभागांना कालबद्ध कार्यवाहीचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली.
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, शेतीला वेळेत पाणी मिळावे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.
