शक्तिपीठ महामार्ग जुन्या आरेखणाप्रमाणे जलद पूर्ण होणार?
(मुख्यमंत्र्यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे स्वप्न धूसर!)
(जुन्या आरेखना पेक्षा नवीन आरेखनाला शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा दहापट तीव्र विरोध)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर,सांगोला व आटपाडी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या जुन्या आरेखनास या परिसरात विरोध होत असल्याचे कारण पुढे करत मोठा बदल करण्यात आला.परंतु जुन्या आरेखना पेक्षा नव्या आरेखनावर दहापट जादा विरोध होताना दिसत आहे. जुन्या आर्यखणावरचा संपूर्ण विरोध मावळलेला दिसत आहे. सदर महामार्ग माढा मोडनिंब,करकंब,वेळापूर अकलूज,माळशिरस या परिसरातून पुढे माण खटाव, वाळवा ,कराड, इस्लामपूर,वारणानगर, करवीर या सुपीक तालुक्यांमधून पुढे तो चंदगड गोवा दिशेने नेण्यासाठी नवीन आरेखन स्वीकारण्यात आले. परंतु जुन्या आरेखनावरील विरोधापेक्षा दहापट जादा विरोध हा नवीन आरेखणावर होताना दिसत असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे शक्तिपीठ महामार्गाचे स्वप्न धूसर झाले आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी अर्थमंत्री जयंत पाटील,आमदार सत्यजित देशमुख ,आमदार विनायक कोरे यासह खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक ,आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, यासह अनेक नेत्यांच्या मतदारसंघातून जनतेचा व शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन आरेखनानुसार भूसंपादनासाठी प्रचंड विरोध दिसत आहे.नव्या आरेखना बाबत अनेक भौगोलिक व तांत्रिक व सामाजिक अडचणी दिसून आल्या आहेत. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यामध्ये महामार्गाच्या प्रचंड उंचीच्या भरावामुळे पुराचे पाणी तुंबून मागे सरकून तसेच अतिवृष्टीचे पाणी साचून मागे सरकून साठून शेतीचे प्रचंड नुकसान होण्याच्या व गावेच्या गावे पुरामध्ये बुडण्याच्या संभाव्य धोक्यामुळे येथील शेतकरी “जीव देऊ पण जमीन नाही” अशी टोकाची भूमिका घेऊन निकराचा लढा देत आहेत. या परिसरात दरडोई जमीन धारणा कमी असल्यामुळे बहुतांश बाधित शेतकरी भूमिहीन होणार असल्याने त्यांच्या विरोधाचे स्वरूप भयंकर आहे. लोकप्रतिनिधींच्या मनात येत्या निवडणुकीत नागरिकांमधील रोशामुळे पराभवाला सामोरे जावे लागेल अशी भीती निर्माण झाली आहे.मोजणी व भूसंपादनाचे काम करण्यासाठी त्या परिसरात शेतीमध्ये पाऊल ठेवण्याचे धाडस अधिकाऱ्यांच्यात उरले नाही. अशा पार्श्वभूमीवर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस यांचा “ड्रीम प्रोजेक्ट” असलेला शक्तिपीठ महामार्गाचे काम निश्चित रखडणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे.
याउलट एकीकडे शक्तिपीठ च्या जुन्या अलाइनमेंट वर शेतकऱ्यांचा, जनतेचा शंभर टक्के विरोध संपल्याचे चित्र दिसत असून येथील प्रत्यक्ष बाधित अशा हजारो शेतकऱ्यांनी लेखी सहमती समर्थनाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे चार महिन्यापूर्वी दिले आहे. या आरेखनावरील सर्व ग्रामपंचायती,नगरपालिका यांनी सुद्धा महामार्गाच्या सहमतीबाबत ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहेत. जुन्या अरेखानावर भूसंपादनाचे 95 टक्के काम गेल्या तीन वर्षात पूर्ण झाले आहे.
अलीकडेच जुन्या आरेखना वरील एक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नामदार गडकरी यांना भेटले व जुन्या आरेखनावर कसलाही विरोध राहिला नसल्याचे व सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार तिजोरीवर येणार असल्याचे तसेच ६० किलोमीटर अंतर वाढुन दीड तासाचा प्रवास वाढणार असून पुढील अनेक पिढ्यांचा इंधनावर पैशांचा अपव्यय होणार व बहुमोल वेळेचाही अपव्यय होणार याबाबत त्यांना सांगितले. त्यावर ते असे म्हणाले होते की विरोध आहे म्हणूनच तर नवीन आरेखन तयार केले गेले आहे जर विरोध संपला असेल तर मग नवीन आरेखनाची गरज काय? व अतिरिक्त वीस हजार कोटी वाया घालवण्याचे कारण काय ? याबाबत त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. जुन्या आरेखनाप्रमाणे महामार्ग बांधावा यासाठी सुमारे २० आमदारांनी त्यांचे समर्थन पत्र माननीय मुख्यमंत्री यांना दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या जुन्या आरेखनानुसारच महामार्ग बांधला जावा असे सर्व अभियंत्यांचे मत असल्याचे समजते. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे शक्तिपीठ महामार्गाचे स्वप्न जुन्या आरेखनानुसार जलद गतीने पूर्ण होऊ शकते तर नव्या आरेखनाप्रमाणे ते अनिश्चित काळासाठी निश्चितपणे रखडणार अशी चर्चा सोलापूर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक व सर्व संबंधित तालुक्याचे आमदार,खासदार यांच्यामध्ये होताना दिसत आहे.

