तुम्हाला ‘त्या’ खानदानी पाटलांचा अभिमान वाटतोय का?
(अजितदादा पवारांना सवाल करत उमेश पाटील यांचा राजीनामा!)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मोहोळच्या स्थानिक राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राजन पाटील यांची बाजू घेतल्याने उमेश पाटील नाराज होते.
आम्ही खानदानी गुन्हेगार आहोत, असे सांगणाऱ्या राजन पाटील यांचा अजित पवार यांना अभिमान आहे का? असा जळजळीत सवाल उमेश पाटील यांनी विचारला.
उमेश पाटील यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय?
मोहोळ येथील जनसन्मान यात्रेनिमित्त आल्यानंतर आपण आणि अजितदादांनी माझ्या बाबतीत पक्ष शिस्तीच्या संदर्भाने काही विधाने केली. अर्थात तो आपला अधिकार आहे. मी सध्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या पदावर असताना मोहोळ विधानसभेचे पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत माने व माझी आमदार राजन पाटील यांच्यावर सातत्याने जाहीर टीका करत असल्याने मी पक्षाची शिस्त एकदा नव्हे तर अनेकवेळा मोडली आहे हे मला मान्य आहे. म्हणून मी विनम्रपणे पक्षाच्या मुख्य प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे.
मोहोळचे आमदार यशवंत माने सुप्रिया ताई सोबत गाडीत बसून गेले. राजन पाटलांनी महायुतीचा खासदार पाडल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटलांचा घरी आणून सत्कार केला. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे तुतारीचा प्रचार केला. नरहरी झिरवाळ यांचा मुलगा जयंत पाटलांना भेटायला गेला. आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटायला गेले. राजन पाटलांनी मागच्या महिन्यात त्यांच्या मुलाच्या वाढदिसानिमित्त केलेल्या जाहिरातीमध्ये अजितदादा व तुमचा फोटो न टाकता रोहित पवार व रोहित पाटील यांचे फोटो टाकले. आमदार यशवंत माने यांनी तुतारीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करून विकासकामांची उद्घाटने केली.. अशी शेकडो पक्ष शिस्तीची उदाहरणे देता येतील. परंतु हे सर्व प्रस्थापित मातब्बर नेते असल्याने कदाचित थोडीफार पक्ष शिस्त मोडण्याची त्यांना सवलत असेल. सामान्य कुटुंबातील माझ्या सारख्या विस्थापित कार्यकर्त्यांना कदाचित ही सवलत नसेल, हे मी समजू शकतो.
राजकीय गरज म्हणून अजितदादांचा पुतळा जाळणाऱ्या राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांची बेशिस्ती आपण निर्लेखित केली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटील यांनी, “आम्ही खानदानी पाटील असल्याने लग्नाच्याही आधी पोरी नासविण्याचा आम्हाला अधिकार आहे, “माझ्या मुलांनी वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलमे भोगली असल्याने, आम्ही खानदानी गुन्हेगार व दहशतवादी असल्याचे” वक्तव्य केले होते. शिवाय त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील म्हटले होते. असा खानदानी पाटील आपल्या पक्षात असल्याचा, अध्यक्ष म्हणून आपल्यालाही अभिमान वाटतोय का?
आपल्या लाडक्या बहिणींना लग्नाच्या आधी नासवण्याचा उद्योग करणाऱ्या, दहशतीचे व गुंडागर्दीचे उदात्तीकरण करणाऱ्या व त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राजन पाटील व त्याच्या मुलांना विरोध करणे तुमच्या राजकीय शिस्तीत बसत नसेल, परंतु छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशा पाटलाला हातपाय कलम करून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती. कारण छत्रपती शिवराय हे प्रस्थापितांचे नव्हे तर विस्थापितांचे राजे होते. आपण शिवरायांच्या राजधानीचे (रायगड) खासदार असताना अशी महिलांची व माता भगिनींची विटंबना करण्याची निर्लज्ज वक्तव्य करून त्याचा अभिमान बाळगत असल्याची वक्तव्ये करणाऱ्या राजन पाटलांवर पक्ष शिस्तीची कारवाई का केली गेली नाही?
शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार व यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणाऱ्या पक्षात असा विकृत “खानदानी पाटील” सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणे हे माझे कर्तव्य समजून मी राजन पाटलांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाच्या मूलभूत विचारधारेशी कटिबध्द आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मला साथ देण्याची अपेक्षा असताना माझ्यावरच पक्ष शिस्तीच्या संदर्भाने टिपण्णी करणे आपल्याकडून अपेक्षित नव्हते. तरीही माझे काही चुकत असल्यास जरूर माझा राजीनामा मंजूर करून जमल्यास क्षमा करावी ही विनंती…