पतसंस्थांच्या जोखडातून शेतकरी राजास मुक्त करा
पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांची विरोधी पक्षनेत्यांकडे मागणी
आजपर्यंत दोन वेळा कर्जमाफी झाली, परंतु खरा कर्जदार शेतकरी त्यापासून बाजूलाच राहिला. शेतकऱ्यांकडे खरी कर्जे पतसंस्थांचीच आहेत, या कर्जापासून शेतकऱ्यास कर्जमुक्त करावे, अशी मागणी पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. या मागणीचा विचार विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी मंडळींनाही करावाच लागेल, असा
विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष
नागेश गंगेकर यांचा त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त वडेट्टीवार यांच्याकडून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कमिटीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष अशपाक सय्यद तसेच सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष बाळासाहेब आसबे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोरे यांनी याबाबतचे निवेदन त्यांच्याकडे दिले.
राज्यातील शेतकरी दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटांमुळे
कायमच घाट्यात आहे.
यातच तीन वर्षापूर्वी त्याने
कोरोणा महामारीचा सामना केला आहे. या काळातही त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या कर्जमाफीत फक्त राष्ट्रीयीकृत बँका आणि
सहकारी सोसायट्यांची कर्जेच माफ करण्यात आली आहेत. या बँकांच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी पतसंस्थांकडून कर्जे घेतली होती. यापैकी अनेक कर्जे थकीत गेली आहेत. या कर्जाच्या जोखडातून शेतकरी राजा मुक्त झाल्यासच खरी कर्जमाफी झाल्याचा आनंद
शेतकऱ्यास मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडील पतसंस्थांची संपूर्ण कर्जे माफ करून, शेतकरी राजास कर्जमुक्त करण्यात यावे, अशी मागणी हनुमंत मोरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
चौकट
प्रत्येक शेतकऱ्याकडे ७५ टक्के कर्ज हे पतसंस्थांचे आहे. याच कर्जामुळे शेतकरी वर्ग भरडला गेला आहे. आत्महत्येचे प्रमाणही याच प्रकारच्या कर्जामुळे वाढत चालले आहे. राज्य सरकारला कर्जमाफी करावयाची असल्यास, शेतकऱ्यांकडे असलेल्या पतसंस्थांच्या कर्जांचा विचार सरकारला करावाच लागेल, अशी भूमिका पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यापुढे मांडली आहे.