विठ्ठलराव शिंदे कारखान्यास नॅशनल फेडरेशन,नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार जाहीर
(विक्रमी गाळप व उच्च साखर उताऱ्यामुळे कारखान्याला यंदाचा पुरस्कार आ. बबनदादा शिंदे)
(जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितभैय्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांचेकडून युनिट नं.1 पिंपळनेर येथील कारखान्यास सन 2022-23 गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप/उच्च साखर उतारा विभागात सहकार क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्याचे मुल्याकंन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता,वित्तीय व्यवस्थापन,अधिकत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणा-या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मुल्यामापन केले जाते. त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक(साखर) यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे वर्ष 2022-23 साठीचे पुरस्कारासाठी कारखान्यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.1 पिंपळनेर या कारखान्याची सन 2022-23 गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. ऊस गळीत हंगाम 2022-23 मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे 18 लाख 41 हजार 420 मे.टन इतके विक्रमी ऊस गाळप झालेले आहे. यापुर्वी कारखान्यास उच्चांकी गाळपासाठी देशपातळीवरील सन 2014-15, 2017-18 व 2021-22 या वर्षासाठी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस पुरवठादार, तोडणी मजूर, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्काराचे वितरण लवकरच दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट नं.1पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.
कारखान्यास यापूर्वी चाचणी व प्रथम गळीत हंगाम २००१-०२ मध्ये विक्रमी ऊस गळीताबद्दल प्रथम क्रमांक, सन २००७-०८ मध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापनाबद्दल द्वितीय क्रमांक, २००३-०४, २००५-०६ व २००९-१० मध्ये उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सन २००६-०७ व २०१०-११ मध्ये सर्वोत्कृष्ट आसवनी,सन २०११-१२ मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजगता व उत्कृष्ट ऊस विकास, २०१२-१३मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स, सन २०१३-१४ मध्ये साखर निर्यात, सन २०१५ मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को. शुगर फॅक्टरी, सन २०१४-१५ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, सन २०१५-१६ मध्ये साखर निर्यात,उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट आसवनी, सन २०१६-१७ मध्ये साखर निर्यात,सन २०१७-१८ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन, सन २०१८ मध्ये को-ऑपरेटीव्ह मेरीट अवॉर्ड, सन 2020-21 मध्ये साखर निर्यात, सर्वोत्कृष्ठ को जनरेशन प्लॅन्ट अशी राज्य व देशपातळीवरील एकूण 24 पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.