ना बॅन्डबाजा ना गाजावाजा; तुंगतमध्ये अनोख्या पद्धतीने झाला वाढदिवस साजरा!
एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचे म्हटले की मोठा गाजावाजा, बॅनर, हारतुरे आणि शुभेच्छांचा वर्षाव असे एकंदरीत चित्र असते. या सगळ्या प्रकाराला छेद देऊन पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रणदिवे आणि स्वाभिमानी शेेतकरी संघटनेचे सोलापूर युवा अध्यक्ष विजय रणदिवे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करुन एक आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे यामुळे स्वतःचा वाढदिवस या परिस्थितीला साजेसा आणि अविस्मरणीय ठरेल अशाच पद्धतीने साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेत रक्तदान शिबीरासह रविवार २३ जुन रोजी तुंगत परिसरातील शेतकर्यांसाठी एक वेगळा उपक्रम राबविला. शेतकर्यांना सध्या पी. एम. किसान योजनेअंतर्गत अर्थिक सहाय्य त्यांचे खातेवर जमा होत आहे असे असले तरी पुरेशा माहिती अभावी अनेक शेतकर्यांना हे हप्ते जमा होताना अडचणी येत आहेत. हे लक्षात घेत त्यांना येणार्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी कॅम्प भरविण्यात आले होते.
येथील गणेश मंदिर सभागृहात आपल्या अडचणी सोडविण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तुंगत ग्रामपंचायत मार्गदर्शक ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांचे संकल्पनेतून आयोजित या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा १०० हुन अधिक शेतकर्यांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन
विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक विठ्ठल नाना रणदिवे, उपसरपंच प्रकाश रणदिवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बत्तासराव वनसाळे, पंकज लामकाने, नारायण रणदिवे, रियाज शेख, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.