मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये
विधानसभा मतदारसंघातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे आवाहन
सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी कटिबध्द असलेल्या महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून येत्या १ जुलै पासून ही योजना सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली असून २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील.सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे, अशा अटी आहेत.
तसेच या योजनेच्या लाभासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. या योजनेसाठी १ जुलै ते १५ जुलै दरम्यान अर्ज सादर करण्याचा कालावधी असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या आहेत.