ज्योत घेऊन येत असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; मंगळढ्यातील 2 जण ठार, 19 जण गंभीर जखमी, गावावर पसरली शोककळा
तुळजापूरहून गोणेवाडी (ता.मंगळवेढा ) येथे ज्योत घेवून जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती खुर्द येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.
यासंदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बागडेबाबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन गावाकडे परतत असताना नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कांमती खुर्द गावाजवळ सकाळी 6:30 ते 7:00 च्या दरम्यान भरदाव वेगातील पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर सदरचे पिकअप कठाड्यावरून पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या गटारीत पडले.
यात 2 जण ठार झाले असून 19 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात प्रदीप क्षीरसागर (वय २८ वर्ष), नेताजी कराळे (वय ३० वर्ष) दोघे (रा.गोणेवाडी ता. मंगळवेढा) अशी मयत दोघांची नावे आहेत.
महेश बंडगर (वर्ष १७), वैभव हजारे (वर्ष २४), सोहेल मुलानी (वर्ष २५), समाधान मासाळ (वर्ष ३०), रोहित कसबे (वर्ष २०), रोहित चव्हाण (वर्ष १२ सर्वजण रा.गोणेवाडी ता. मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत.
गोणेवाडी गावावर शोकाकुल पसरली असून गावातील सरपंच बाबासाहेब मासाळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना मदत केली व सदर जखमी भाविकांची सोलापूर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.