
टेंभू, म्हैसाळ योजनेतून सर्व बंधारे भरून देण्यात येणार – चेतनसिंह केदार सावंत
आठवड्यात रब्बी हंगामासाठी टेंभू,म्हैसाळचे आवर्तन सुरू होणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सांगोला रब्बी हंगामासाठी टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून येत्या आठवड्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असून बुद्धेहाळ तलावासह माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. आठवडाभरात टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. नदी, तलाव,बंधारे ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभाच्या उद्घाटनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर हे चिकमहूद येथे आले होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्याशी संपर्क साधून टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार २५ फेब्रुवारीपासून टेंभूचे योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.