
श्रीकृष्ण गुरुकुलचे प्रमोद आवताडे यांचा
पुरस्काराने सन्मान!
अलीकडच्या काळात फक्त शहरी विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी बनलेली गुरुकुल शिक्षण पद्धती ग्रामीण भागात सुरू करून ती वृद्धिंगत करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीकृष्ण गुरुकुलचे संस्थापक प्रा.प्रमोद आवताडे यांच्या कार्याचा एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वतीने गौरव करण्यात आला.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वतीने राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नामांकितांचा महाराष्ट्राचे अनमोल रत्न हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक गावचे सुपुत्र प्रा.प्रमोद आवताडे आणि हनुमंत निकम यांचा समावेश आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांच्या हस्ते प्रा.आवताडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवेदिका स्पृहा जोशी,श्रीकृष्ण गुरुकुलचे उपाध्यक्ष हनुमंत निकम उपस्थित होते.
प्रा.आवताडे यांनी मोहोळ तालुक्यातील वाघोली – वाघोलीवाडी येथे श्रीकृष्ण गुरुकुलची स्थापना करून इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत. कामाती बुद्रुक येथे राधा गुरुकुलच्या माध्यमातून इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या मुलींचे वर्ग सुरू की आहेत तर कामती खुर्द येथे ज्युनियर कॉलेजची सुरुवात केली आहे.हे सर्व वर्ग निवासी स्वरूपाचे आहेत. तीनही मिळून एकूण जवळपास दीड हजार विद्यार्थी या गुरुकुल मध्ये शिक्षण घेत आहेत. या गुरुकुल मध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी यशाचा नवा मापदंड निर्माण करताना निकालाची उज्वल परंपरा निर्माण केली आहे. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दारात घेऊन जाण्याच्या प्रा.प्रमोद आवताडे यांच्या प्रयत्नाची दखल घेऊन एबीपी माझाने त्यांचा गौरव केला आहे.त्यांच्या या यशाचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे.
: चौकट :
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसावर विश्वास ठेऊन ज्या पालकांनी आपली मुले श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठविली आहेत.पालकाच्या विश्वासाला पात्र राहून मी आणि गुरुकुल मधील प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम घेत आहे. या यशाची कमान चढती ठेवणे हे आमचे अंतिम ध्येय आहे.
प्रा.प्रमोद आवताडे.