*पत्रकारिता समाजाला दिशा देण्याचे माध्यम:- सचिन इथापे*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पत्रकारिता केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही तर समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. पत्रकार समाजाचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत आणि लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे मत प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी व्यक्त केले
दिनांक 06 जानेवारी रोजी राज्यात सर्वत्र मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर अधिनस्त उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका व शहरातील विविध माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री इथापे म्हणाले, पत्रकारितेत पूर्वी केवळ छापील वृत्तपत्र असायचे आता दूरचित्रवाहिन्यांची संख्या मोठी झाली आहे. तसेच समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. दिवसभर माध्यमावर एखादी घटना सतत ऐकूनही सकाळी वर्तमानपत्राच्या पानावर ते वृत्त वाचण्यासाठी असलेली ओढ अजूनही समाजात आहे. वर्तमानपत्रातील अग्रलेखांनी सरकारमध्ये उलतापालथ केली आहे. समाज सुधारण्यासाठी वर्तमानपत्र गरजेचे आहे. जे समाज सुधारक होऊन गेले त्यांनी पहिले वर्तमान पत्र काढले. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक कुप्रथा विरुद्ध लेखन केले. ब्रिटिश काळात लोकांना स्वातंत्र्य, न्याय आणि समानतेची जाणीव करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय चेतना जागृत केली. समाजाचा आवाज मांडण्याचे माध्यम हे पत्रकारिता आहे. विधानसभेत जसा शिक्षक मतदार संघ आहे तसा पत्रकार मतदार संघ असावा एवढे मोठे कार्य पत्रकारांनी केले असल्याचेही प्रांताधिकारी श्री इथापे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले.
*‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन*
उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे आज दिनांक 6 जानेवारी ‘पत्रकार दिनानिमित्त’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पत्रकारितेकडे समाजाचे प्रबोधन आणि शासन व प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब समाज्यांमध्ये उमटत असते. लोकशाहीत चतुर्थ स्तंभ हा महत्त्वाचा आहे. आणि या चतुर्थ स्तंभाला बळ देणारा आजचा दिवस असल्याचे सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे सांगितले.
