प्रिन्स सुनील पाटील ठरला हस्तलिखित शब्दकोश तयार करणारा भारतातील सर्वात लहान विद्यार्थी!
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील नामांकित शिक्षण संकुल जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी मास्टर प्रिन्स सुनील पाटील (वय १३) याने अवघ्या तीन महिन्यात १७,७५० पेक्षा अधिक इंग्रजी शब्दांचा हस्तलिखित शब्दकोश तयार करून साहित्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शब्दकोशात इंग्रजी-इंग्रजी अर्थ देऊन शब्दांची वर्णानुक्रमाने मांडणी करण्यात आली असून तो सुंदर व स्पष्ट हस्ताक्षरात लिहिला आहे. त्याला या कामी प्राचार्या सौ. स्मिता शिवगोंडा पाटील आणि वर्गशिक्षक प्रीतम बाळासो हासुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे इयत्ता आठवीत शिकणार्या मास्टर प्रिन्स सुनील पाटील (वय १३) याची या कामगिरीबद्दल लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् Limca Book of Records तसेच ग्लोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् Global Book of World Records मध्ये नोंद झाली असून त्याला ‘भारताचा सर्वात लहान शब्दकोशकार’ ‘India’s Youngest Lexicographer’ व ‘सर्वात लहान लेखक’ ‘Youngest Male Author’ हा किताब मिळाला असून हा विक्रम लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् Limca Book of Records च्या २०२७ च्या आवृत्ती मध्ये प्रकाशित होणार आहे.
तसेच त्याने यापूर्वी अनेक पुस्तकांचे संपादन आणि लेखन केले असून ती पुस्तके ई-बुक्स आणि छापील स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याने तयार केलेला शब्दकोश लवकरच कवितासागर पब्लिशिंग एजन्सी, जयसिंगपूर मार्फत अधिकृत ISBN क्रमांकासह प्रकाशित होणार असून गुगल बुक्स Google Books वरही उपलब्ध होणार आहे. प्रिन्सची ही कामगिरी शाळा व परिसरासाठी अभिमानाची आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले असून सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
