पंढरपूरला १००० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार!
(राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत पंढरपूरात माहीती)
तीर्थक्षेत्र पंढरपूरला लवकरच १००० खाटांचे एक अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. या घोषणेची माहिती आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली.
पंढरपूरला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात तर वारकऱ्यांची संख्या आणखी वाढते. मात्र, सध्याचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या गर्दीला पुरेसे नव्हते. तीर्थक्षेत्र पंढरपूर हे धार्मिक स्थळ असून येथे नेहमीच भाविकांची मोठी संख्या असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतून आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नवीन १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता..
याची दखल घेत आषाढी वारी २०२४ दरम्यान महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंढरपूर येथे या रुग्णालयाच्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी या दिशेने प्रयत्न सुरू केले आणि आता या रुग्णालयाला राज्य सरकारची विशेष मंजूरी मिळाली आहे.
या नवीन रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. येथे आपत्कालीन सेवा, ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन थिएटर, लॅब, एक्स-रे आणि इतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांच्या सुविधा असतील.
या रुग्णालयाचा फायदा पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना होईल. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात येणाऱ्या लाखोंच्या संख्येतील वारकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या रुग्णालयाचे काम देखील लवकरच सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली.