
नीट (NEET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा राज्य सीईटी सेलकडून १५ टक्के कोटयातुन फार्मसी प्रवेशासाठी संधी!
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झालेली आहे. त्याअनुषंगानेच वैद्यकीय शिक्षणासाठी NEET (नीट) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता नीट परीक्षा दिलेल्या परंतु राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी) परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही सीईटी सेलने सदर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १५ टक्के कोटयाची तरतूद केलेली असल्याने बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सीईटी सेलच्या सुचनेनुसार, नीटची पात्रता व मार्क्सच्या आधारे विद्यार्थ्यांना फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या पण वैद्यकीय शिक्षणास प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी हे एक उत्तम करिअरचे पर्याय ठरणार आहे.
अलीकडच्या काळात म्हणजेच कोविड नंतरच्या काळात औषधनिर्मिती व आरोग्यसेवा क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वाढलेली असल्याने फार्मसी औषधनिर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी असुन सरकारी आणि खासगी रुग्णालयांत फार्मासिस्ट म्हणून नोकरीची संधी आहे तसेच औषध संशोधन, उत्पादन, निर्यात व मार्केटिंग या क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची संधी विद्याथ्यांना प्राप्त होते.
असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिटयुटस्, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तथा दत्तकला शिक्षण संस्था, भिगवणचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यामते, नीट परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील मूलभूत ज्ञान चांगले असल्यामुळे ते फार्मसी अभ्यासक्रमात सहज प्राविण्य मिळवू शकतात. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती नाही. तरी अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी नीट गुणपत्रकाच्या आधारे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार जागा वाटप केले जाईल. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.
फार्मसी क्षेत्र हे वैद्यकीय क्षेत्राइतकेच महत्वाचे मानले जाते. नीट विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र नव्या करिअरच्या दारासारखे आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही सोन्याची संधी आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी दि. २१ जुलै २०२५ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत सीईटी सेलच्या वेबपोर्टलवर नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी असे आव्हान प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.