सांगोल्यातील सात ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील हणमंतगाव, एखतपूर, उदनवाडी, बुरंगेवाडी, जुजारपुर, लक्ष्मीनगर, महिम या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यात ७६ ग्रामपंचायती अस्तित्वात असून त्यामधील बहुतांश ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने ग्रामपंचायतींचा कारभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. सदर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींसाठी इमारत निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत सांगोला तालुक्यातील हणमंतगाव ग्रामपंचायतीला २० लाख, एखतपूर ग्रामपंचायतीला २५ लाख, उदनवाडी ग्रामपंचायतीला २५ लाख, बुरंगेवाडी ग्रामपंचायतीला २५ लाख, जुजारपुर ग्रामपंचायतीला २५ लाख, लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीला २५ लाख, महिम ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये असा १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करताना ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनःर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करून ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.